बंगळुरू : कर्नाटकातील ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक एच. एस. व्यंकटेश मूर्ती यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. एचएसव्ही या टोपण नावाने ते प्रसिद्ध होते. खासगी रुग्णालयात शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात चार मुलगे आहेत. कन्नड साहित्यात त्यांनी अमूल्य योगदान दिले. विश्लेषक, नाट्यलेखन, कादंबरीकार आणि बालसाहित्य, भाषांतर, टीकाकार, चित्रपट गीते आणि संवाद लेखनावर त्यांचे प्रभुत्त्व होते. बंगळुरू येथील सेंट जोसेफ वाणिज्य महाविद्यालयात त्यांनी तीन दशके ज्ञानदानाचे कार्य केले. सुगम संगीतकार आणि भावगीतांची कन्नड भाषेत रचना करणारे कवी म्हणून त्यांची ख्याती होती. चिनारी मुथा, अमेरिका- अमेरिका आणि क्रींक पार्टी या सारख्या चित्रपटांसाठी त्यांनी गीते लिहिली., उरिया उय्य्याला, अग्निवनां आणि मथरे ही त्यांची नाटके गाजली होती. कलबुर्गीतील अखिल भारतीय कन्नड साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. तसेच साहित्यसेवेबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविले होते. कन्नडदल्ली कथा कवनगालू’ यावरील संशोधनासाठी त्यांना साहित्यातील डॉक्टरेट मिळाली होती.
Fans
Followers